Bhusawal भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट पत्र, शिक्का व स्वाक्षरी वापरून प्लाटची विक्री करण्याच्या प्रकरणात नायब तहसीलदार व लिपीकाला अटक करण्यात आली असून चार सर्कल व १७ तलाठ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
तहसीलदारांचे बनावट आदेश वापरून शहरातील जनकल्याण पतसंस्थेचा विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे याने संस्थेचे प्लॉट विकल्याचे प्रकरण आता चांगलेच गाजत असून यात अधिकार्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात पोलिसांनी काल सायंकाळी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे आणि लिपिक शाम तिवारी यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच याच प्रकरणात पोलिस ४ मंडळ अधिकारी आणि सुमारे १७ तलाठ्यांची चौकशी करून जबाब नोंदवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचे बनावट आदेशपत्र तयार करून १० जणांना विक्री केले. याप्रकरणी धांडेसह प्लॉट खरेदी करणारे मिळून ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी धांडे यांना तहसीलदारांकडून प्लॉट विक्रीचे परवानगी पत्र हवे होते. त्यासाठी धांडेंनी भूषण बेंडाळे या दलालाच्या माध्यमातून नायब तहसीलदार इंगळे यांची भेट घेतली. यानंतर इंगळेंनी संबंधित आदेश करण्याच्या सूचना लिपिक शाम तिवारी यांना दिल्या. त्यानुसार तिवारीने पत्र काढल्याची माहिती समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.