भुसावळ प्रतिनिधी । सध्या कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे भुसावळ नगरपालिकेने ना नफा-ना तोटा या तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करावी अशी मागणी आज भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागली असून यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. या पार्श्वभूमिवर आज भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष रमण भोळे आणि मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना एक निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाची व्याप्ती वाढली असून रेमडेसिवीरचा देखील तुटवडा भासत असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत आहे. यामुळे सेवा हेच कर्तव्य असे ब्रीद असणार्या भुसावळ नगरपालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून ते ना नफा-ना तोटा या तत्वावर भुसावळातील नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत.
भाजपचे शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील आणि सरचिटणीस संदीप सुरवाडे यांनी हे निवेदन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्यांना दिले.