भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेच्या २५ प्रभागांमध्ये ५० नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. १० नोव्हेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल प्रक्रिया सुरुवातीला मंद गतीने सुरू असली तरी १४ नोव्हेंबरपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत असल्याने शनिवारी, रविवारी आणि सोमवारी उमेदवारांकडून प्रांत कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे.
वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी फक्त उमेदवार आणि एक सूचक या दोघांनाच प्रवेश दिला जाईल, असे जाहीर केले. यामुळे प्रांत कार्यालयातील गोंधळ टाळण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळात सांगितले जात आहे.

दरम्यान, भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज सकाळपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रांत कार्यालयात उत्साहात सुरू राहिली. पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली असून परिसरात उत्सुकता आणि स्पर्धेचे वातावरण दिसून येत आहे. कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने निवडणुकीचा माहोल रंगू लागला आहे.
महुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीकडून उमेदवारी अर्ज भरतानाचे चित्र आज स्पष्टपणे पाहायला मिळाले. महायुतीचे उमेदवार युवराज दगडू लोणारी यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली. तर जनरल प्रभागातून पूनम वसंत पाटील यांनीही भाजपाच्या वतीने अर्ज दाखल केला. “आम्ही दोघेही भाजपातर्फे निवडणूक रिंगणात आहोत आणि महायुतीचा पाठिंबा आमच्यासोबत आहे,” असे युवराज लोणारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे जात असताना, पुढील दोन दिवसांत आणखी मोठी उमेदवारी लाट दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे राजकीय समीकरणे, प्रभागांतील रणनीती आणि स्थानिक स्तरावरील चर्चांना अधिक वेग आला आहे.



