Home Cities भुसावळ भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 7 ‘अ’ मधून प्रिती मुकेश पाटील बिनविरोध...

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 7 ‘अ’ मधून प्रिती मुकेश पाटील बिनविरोध विजयी

0
340

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मधील महिला राखीव गटातून भारतीय जनता पक्षाच्या प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्याने शहरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. नामनिर्देशनपत्र छाननीच्या दिवशीच विजय निश्चित झाल्याने भाजपचे मनोबल भक्कमपणे वाढले असून हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.

या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सारिका युवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या AB Form मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अर्ज बाद ठरविला. सारिका पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर या प्रभागात विरोधात कोणताही अन्य उमेदवार उरलाच नसल्याने प्रिती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते मुकेश नरेंद्र पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की, प्रभाग 7 ‘अ’ मधील हा बिनविरोध विजय पक्षासाठी अभिमानाचा क्षण असून या निवडणुकीत पक्षाने जळगाव जिल्ह्यातील पहिले खाते यशस्वीपणे उघडले आहे. भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेला हा ‘वॉकओव्हर’ विजय विरोधकांसाठी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये या विजयाबद्दल उत्साहाचे वातावरण असून आगामी प्रभागांमध्येही पक्ष अधिक मजबूत उभा राहील, असा विश्वास पक्षनेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. छाननीच्या दिवशीच निकाल लागल्याने हा विजय चर्चेचा विषय ठरला आहे.


Protected Content

Play sound