भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरसेवक अपात्रता प्रकरणी १८ जुलै रोजी अंतीम सुनावणी होणार असून यात काय निकाल लागणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ शहरातील सत्तासंघर्षातील एक अंक हा नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. भुसावळ पालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून रमण भोळे निवडून आले होते. यासोबत अमोल इंगळे ( प्रभाग १-ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १-अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २-अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६-ब), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), ऍड. बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते (२२ ब) आणि शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यांनी २९ डिसेंबर २०२१ हा नगरसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच १७ डिसेंबरला तात्कालिन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता.
यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह इतरांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी करणारा तक्रार अर्ज पुष्पा बत्रा यांनी केला असून यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. यात गुरूवारी सुनावणी झाली असता १८ जुलै रोजी अंतीम सुनावणी होणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्थात, त्या दिवशी अंतीम सुनावणी झाल्यानंतर अपात्रतेबाबत निकाल लागू शकतो. या निकालात नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.