भुसावळात गुन्हेगारांची ओळख परेड

भुसावळ प्रतिनिधी | बाजारपेठ आणि भुसावळ शहर पोलीस स्थानकांच्या हद्दीतील गुन्हेगारांची पोलीस प्रशासनाने ओळख परेड घेतली असून यातून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.

भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ओळख परेड घेण्यात आली. त्यात शहर हद्दीतील ११ व बाजारपेठ च्या हद्दीतील २१ अशा एकूण ३२ संशयितांना पाचारण केले होते. पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरटे, गावठी पिस्तूल बाळगणारे अशा संशयितांची यादी तयार केली होती. त्यातून शनिवारी जबरी चोरी करणारे व शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड झाली.

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठेचे निरीक्षक राहूल गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय प्रकाश वानखेडे यांनी संशयितांची सविस्तर चौकशी करून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले. त्यात संशयित सध्या कुठे राहतो, काय काम करतो? कोणते वाहन वापरतो? त्याचे मित्र कोण? वापरता मोबाइल कोणता? ही माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांच्याकडून शहरातील अन्य सक्रिय गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेण्यात आली.

Protected Content