भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्रलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, यासाठी शासनाने ११ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर झंडा’ हा उपक्रम राबवला असून यात शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.
केंद्र सरकारने हर घर झंडा या उपक्रमाची घोषणा केली आहे. याची भुसावळ पालीका हद्दीत यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात भुसावळकरांनी हिरीरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामालील घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शहरातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी आपल्या कार्यालयासमोर, तसेच शहरातील प्रत्येक नागरिकाने घरासमोर राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रध्वज हे हाताने तयार केलेले अथवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादी पासून बनविलेले असावेत. तसेच ध्वजारोहण करत असताना भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे, राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे तसेच इतर उपक्रमांचे छायाचित्रे, चित्रफिती, केंद्र शासनाच्या राीळींारहेींीर्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर उपलोड करावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत देशभरात विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.