भुसावळ प्रतिनिधी | आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून यावरून लोकांना पैसै मागण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, त्यांनी सतर्कता दाखविल्याने हे अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात फेसबुक अकाऊंट हॅक करून वा बनावट अकाऊंट तयार करून यावरून फ्रेंड यादीतील मंडळकडून इनबॉक्समधून पैसे मागण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात हे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या अनुषंगाने भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून याद्वारे मित्रांच्या यादीतील लोकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार घडला आहे.
आमदार संजय सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली आहे. हा सर्व खोडसाळपणाचा प्रकार असून कुणी याला बळी पडू नका असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले होते. दरम्यान, आ. सावकारे यांनी याबाबत फेसबुककडे तक्रार केली. यामुळे काही तासांमध्येच हे बनावट अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आल्याची माहिती त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.