भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले तत्कालीन नगराध्यक्ष तसेच नऊ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषीत करण्याच्या निर्णयावर नगरविकास खात्याने शिक्कामोर्तब केले आहे.
याबाबत वृत्त असे की, २०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर रमण देवीदास भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यांची मुदत पुर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी असतांना १७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्यांनी १८ जुलै २०२२ रोजी निर्णय दिला होता.
या निकालात जिल्हाधिकार्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, शोभा अरूण नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, सविता रमेश मकासरे यांना अपात्र करण्यात आले होते.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाला हा दहाही मान्यवरांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली होती. यावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी या सर्वांचे अपील फेटाळून लावत जिल्हाधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी, रमेश भोळे यांच्यासह याच नऊ नगरसेवकांना आता पुढील सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. नगरपालिकेची निवडणूक ही तोंडावर असतांना हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आणि पर्यायाने एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण हे सर्व जण आमदार एकनाथराव खडसे यांचे समर्थक होते. या निर्णयाचा आगामी निवडणुकीवर व्यापक परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.