भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेने हद्दवाढीच्या केलेल्या प्रस्तावावर संबंधीत गावांमधील लोकप्रतिनिधींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी आपले शहर सुधारा, मगच आम्हाला सहभागी करा असा टोला मारत त्यांनी हद्दवाढीबाबत नापसंती व्यक्त केली आहे.
याबाबत वृत्तांत असा की, भुसावळ नगरपालिकेने नुकत्याच झालेल्या सभेत शहराची हद्दवाढ करण्याचा प्र्रस्ताव संमत केला. याच्या माध्यमातून परिसरातील साकेगाव व कंडारीसह काही गावे भुसावळ शहराच्या हद्दीत येणार आहेत. यासाठी तसा विलंब लागणार असला तरी नगरपालिकेच्या या हालचालींमुळे खळबळ उडाली आहे. लाईव्ह ट्रेंड न्यूजने आधीच यावरून वादंग होण्याची शक्यता असल्याचे भाकित केले होते. आणि झालेही तसेच. या निर्णायावरून संबंधीत ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाम विरोध-जि.प. सदस्य रवींद्र पाटील
जिल्हा परिषद सदस्य तथा साकेगाव येथील रहिवासी रवींद्र नाना पाटील यांनी नगरपालिकेच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागात भुसावळपेक्षा चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत असून येथे करदेखील कमी भरावा लागतो. मात्र शहराच्या हद्दीत आल्यास येथील ग्रामस्थांवर वाढीव कराचा बोजा पडणार असून त्यांची गैरसोयदेखील होणार आहे. यामुळे ग्रामस्थांचा शहर हद्दीत जाण्यासाठी विरोध असून आपण स्वत:देखील याला कडाडून विरोध करणार असल्याचे रवींद्र पाटील म्हणाले.
विरोधच करणार- सर्वांचा सूर
पंचायत समिती सदस्या आशा संतोष निसाळकर यांनीदेखील आपण भुसावळ नगरपालिकेच्या ठरावाला विरोध करणार असल्याचे सांगितले. कंडारी येथील सरपंच योगिता संदीप शिंगारे यांनी तर आपण यासाठी लागणार ठराव देणार नसल्याचे स्पष्ट केले. फेकरी सरपंच निर्मला सुकदेवराव निकम म्हणाल्या की, भुसावळवासियांना भेटत नाही तर ग्रामीणच्या काय करणार? आज ग्रामीणमध्ये पाणी मिळते. तसेच येथे आम्ही ग्रामस्थांना सुविधा देतो. भुसावळ शहरात जाऊन यापैकी काहीही भेटणार नसल्यामुळे आम्ही याला विरोध करणार आहोत. कन्हाळा बुद्रुकचे सरपंच राजेंद्र भाऊराव पाटील म्हणाले की मी माझ्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत ठराव देणार नाही. भुसावळच्या प्रशासनाने आधी शहर चांगले करावे मगच आम्हाला सहभागी होण्यासाठी बोलवावे. तर चोरवड येथील सरपंच रेखा प्रवीण गुंजाळ म्हणल्या की, आमच्या गावात ढोरांना.लोकांना पाणी मिळते. शहरात आल्यानंतर जनतेला पाणी नाही तर ढोरांना कुठून देणार ? माझा गाव हाच माझा पक्ष असल्यामुळे आपण जनतेचे हित पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर साकेगाव येथील सरपंच अनिल पाटील यांनी मात्र थोडा वेगळा सूर लावला. ते म्हणाले की, मी याबाबत प्रांताधिकार्यांशी बोललो. तर त्यांनी या प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले. यामुळे इतरांचे होईल तेच आमचे होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.