भुसावळ प्रतिनिधी । मनुष्यजन्मात आल्यानंतर आपल्या पूर्वजन्माप्रमाणे प्रत्येकाच्या वाट्याला सुख-दुःख येत असते. या सुख-दुःखाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळविण्याचे साधन म्हणजे भागवत कथा असून, यामुळे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व परमआनंदाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन राम मंदिर जळगाव येथील हभप दादा महाराज जोशी यांनी केले. उदय बोंडे, नयना बोंडे व परिसरातील सहकारी सदस्यांतर्फे मुक्ताई कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.
दैनंदिन जीवनात जगात ज्याच्याकडे पुष्कळ असते, त्याला आणखी मिळते आणि ज्याला खरोखरच गरज असते त्याला काहीच मिळत नाही, परंतु अशावेळी ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची शिकवण महत्त्वाची ठरते, असेही दादा महाराज जोशी यांनी सांगितले. मनुष्याकडे केवळ ज्ञान असून उपयोग नाही. त्या ज्ञानाचे रूपांतर त्यागात होणे अपेक्षित असते भगवान श्रीकृष्ण व मित्र सुदामा यांची मैत्री अतूट होती. यात सुदामाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्या स्थितीतही तो समाधानी होता. तेच तत्त्व समाजात प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. महाभारतात असलेली सुदामाची ही वृत्ती केवळ एक प्रसंग नसून प्रतिकूल परिस्थितीतही मनुष्याने समाधानी राहावे, ही समस्त मनुष्यमात्राला दिलेली फार मोठी शिकवण असल्याचे स्पष्ट केले. सोमवारी गीता पारायणाने सप्ताहाची समाप्ती करण्यात आली.
भागवत कथेचे केले निरुपण
या भागवत कथेत हभप भास्कर महाराज दाताळेकर यांनी दररोज श्री भागवत महात्म्य, श्री नारद – व्यास संवाद, सतीचरित्र, ध्रुवाख्यान, भरतचरित्र, नृसिंह अवतार, श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पूजा, कंसवध, द्वारकालीला, सुदामा पूजन, उद्धवोपदेश आदींच्या माध्यमातून भागवत कथेचे निरुपण केले. या कार्यक्रमांचा आनंद जळगाव रोड भागातील श्रीनगर, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, अष्ट विनायक कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भोई नगर, मोहित नगर, जुना सातारा या परिसरातील नागरिकांना घेतला. उदय बोंडे, नयना बोंडे, प्रा.धिरज पाटील, सुनील बऱ्हाटे, किशोर चौधरी, तुषार नारखेडे, टिकाराम राणे, अमोल पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील, अनिल नारखेडे, अशोक बेंडाळे, प्रदिप बोंडे, प्रमोद बोंडे यांनी परीश्रम घेतले. उद्या दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.