भुसावळ प्रतिनिधी । येथील भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, ईव्हीएम मशीनमुळे घोटाळा होत आहे. कोणतेही बटन दाबल्यावर मत भाजपच्या उमेदवारांना जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि एमआयमच्या नेत्यांनी केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज (दि.17) राज्यभर ‘ईव्हीएम हटाव, बँलेट पेपर लाव’ या प्रमुख मागणीसाठी राज्यभर तालुक्याच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11.०० वाजेपासुन 3.०० वाजेपर्यंत घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हटवून बँलेट पेपर वर मतदान घेण्यात यावे अशी मागणी वंचित आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यावेळी, आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब पवार, सुदाम सोनवणे, गणेश इंगळे, गणेश जाधव, विद्यानंद जोगदंड, मुन्ना सोनवणे, एमआयएमचे फिरोज खान, मुजाहिद्दीन शेख, कलीम शेख, वंदना सोनवणे, संगिता भामरे, दिपमाला हिवाळे व अमोल बनसोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.