भुसावळ प्रतिनिधी । शहरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून विभागात अल्प पावसाची नोंद होत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला तर जुलै महिना कोरडा गेला आहे. यंदाही पावसाने सरासरीच्या तुलनेत १५ जुलैपर्यंत चाळीशी ओलांडलेली नाही. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे दिवस वाढले असून पावसाचे प्रमाण कमीच आहे.
तालुक्यातील ५ हजार, यावल रावेरमधील प्रत्येकी १० हजार, मुक्ताईनगरातील ८ हजार, बोदवडमधील ६ हजार अशा एकूण ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर सध्या दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विभागातील सर्व तालुक्यांत पावसाने जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत ४० टक्के देखील सरासरी गाठलेली नाही. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र आठवडाभरापासून हुलकावणी दिली आहे. जूनच्या अखेरच्या व जुलैच्या पहिल्या आठवड्यात विभागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून सध्या पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. दमदार पाऊस नसल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अल्प आहे. दमदार पाऊस नसल्याने यंदा विभागातील केळी लागवडीवर परिणाम झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर ही लागवड सुरु झाली. मात्र सातत्याने पाऊस कमी होत असल्याने आता केळीऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून गेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाने ब्रेक दिला आहे. काही भागात १० ते २० मिनिटे रिपरिप पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन ते तीन दिवसांत पाऊस न आल्यास स्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
<iframe width=”650″ height=”350″ src=”https://www.youtube.com/embed/chOyods9-QI” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture” allowfullscreen></iframe>