जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेळगाव बंधार्याजवळच तापी नदीवर पुल बांधण्यात येत असून या मार्गाचे आधीच विस्तारीकरण झालेले आहे. यातच आता आसोदा येथील रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाची निर्मिती होणार असल्यामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार असून आसोदा, भादलीसह परिसराचा विकास देखील होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आसोदा गेटजवळच्या रेल्वे उड्डाण पुलास २०१९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तब्बल २३ कोटी ४८ लक्ष रूपयांची तरतूद असणारा हा पुल सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येणार असून याची जबाबदारी महारेलवर टाकण्यात आलेली आहे. वर्षभरात हा पूल पुर्ण होणार असून या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी परिसरातील जनतेला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती देखील होणार आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अनेक महत्वाच्या पुलांच्या कामांना गती मिळालेली आहे. यात प्रामुख्याने शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तर पिंप्राळा आणि भोईटेनगर पुलांचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हसावद आणि दापोरा येथील पुलांचे काम प्रगतीपथावर असून खेडी- भोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीवर भव्य पुलाची निर्मिती देखील लवकरच होणार आहे.
या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांच्याच पाठपुराव्याने जळगाव ते आसोदा या दोन्ही गावांना जोडणार्या रेल्वेवरील उड्डाण पुलास २०१९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यासाठी २३ कोटी ४७ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी ४ कोटी रूपयांचा निधीही ऑक्टोबर २०२१ मध्ये अदा करण्यात आलेली आहे. यानंतरचे सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पार पडल्यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपुजन करण्यात आले. महारेलचे डीजीएम अधिकारी प्रभात किरण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पुलाची तांत्रीक माहिती देऊन याचे काम वेळेत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण विकास कामांमध्ये कधीही शहर आणि ग्रामीण असा भेद केलेला नाही. यातच हा उड्डाण पुल जळगाव आणि आसोदा म्हणजेच शहर आणि गावाला जोडणारा आहे. या भागावर वाहतुकीचे खूप मोठे प्रमाण असून रेल्वे गेटमुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असतो. याची दखल घेऊन या गेटजवळच रेल्वे उड्डाण पुल निर्मितीसाठी आपण पाठपुरावा केला असून आज भूमिपुजनाच्या माध्यमातून हे काम प्रत्यक्षात सुरू होत असल्याचा आपल्याला आनंद आहे.
यावेळी सदर पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने करून मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना ही ना.गुलाबराव पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याआधी तापी नदीवर शेळगाव ते टाकरखेडा आणि वाघूर नदीवर कडगाव ते जोगलखेडा या गावांच्या दरम्यानच्या पुलांचे काम आधीच सुरू झालेले आहे. यात आता उड्डाण पुलाचे काम सुरू होणार असून हा पूल पुर्ण झाल्यानंतर येथील वाहतुकीला वेग येणार आहे. यामुळे जळगाव आणि यावलमधील अंतर कमी होणार असून साहजीच परिसरातील प्रगतीला देखील पंख लागणार आहे. आगामी काळात उर्वरित कामांना वेग देण्याचा आपला प्रयत्न असेल अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.कार्यक्रमाचे आभार तुषार महाजन यांनी मानले.
असा असेल रेल्वेचा उड्डाण पुल
आसोदा रेल्वे गेट जवळच्या उड्डाण पुलाचे काम हे सार्वजनीक बांधकाम खाते आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येत असून याच्या कार्यान्वयनाची जबाबदारी ही महारेलवर टाकण्यात आलेली आहे. या पुलाची लांबी ७६० मीटर असून यात ७ गाळे असणार आहे. हा पूल वर्षभरात तयार होणार आहे. या पुलाचे संपूर्ण काम हे राज्य सरकारच्या निधीतून करण्यात येणार असल्याची बाब लक्षणीय आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, नगरसेवक प्रवीण कोल्हे, भरत सपकाळे, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, तुषार महाजन, किशोर चौधरी, आसोदा येथील सरपंच पती दिलीप पाटील, उपसरपंच पती गिरीश भोळे, रेल्वेचे डीजीएम प्रभात किरण, गोटू नारखेडे, मुकेश महाजन, शरद नारखेडे, राजू महाजन यांच्यासह आसोदा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.