जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात भव्य माता व बाल संगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून आज या इमारतीच्या कामाचे भूमिपुजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविडच्या आपत्तीमुळे जिल्हा आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. यामुळे या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून आता माता व बाल संगोपन हॉस्पीटलच्या माध्यमातून नवजात शिशू आणि प्रसूत मातांसाठी अतिशय अत्याधुनीक अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे १०० खाटांचे रूग्णालय मॉडेल हॉस्पीटल म्हणून लौकीकास येणार असून ते गोरगरिबांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शासकीय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांची सुविधा असणार्या आणि तब्बल २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. सदर हॉस्पीटल हे सुमारे १३ ते १४ महिन्यांमध्येच पूर्ण होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. प्रमोद पांढरे, इंजि. हरिष पवार, किशोर पाटील, योगेश जावरे, संगोयोचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, आरोग्यसेवक डंपिं सोनवणे, भूषण पाटील, डॉ. गायकवाड, ठेकेदार गणेश ठाकरे यांच्यासह डॉक्टर, व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ना. गुलाबराव पाटील यांनी विधीवत पुजन करून कुदळ मारत या इमारतीचे भूमिपुजन केले. आमदार संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतातून कोविड पश्चात कालखंडात उत्तम आरोग्य सेवा देण्यात येत असून हे हॉस्पीटल यातील पुढचे पाऊल ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गेल्या दोन वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे करण्यात आलेल्या बळकटीकरणासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून माता व बाल संगोपन हॉस्पीटलसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, २०१८ साली या हॉस्पीटलचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याला गेल्या वर्षी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आता काम सुरू होत आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र तर ४० टक्के वाटा राज्य सरकारचा असून यासाठी २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या हॉस्पीटलमध्ये प्रसूत झालेल्या महिला आणि नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभागासह अद्ययावत अन्य सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. अनेक ग्रामीण गर्भवती महिलांना आधुनिक महागडे उपचार घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी हे हॉस्पीटल वरदान ठरणार आहे. तर येथील विविध सुविधांचा विचार केला असता काही वर्षातच हे हॉस्पीटल मॉडेल हॉस्पीटल म्हणून ख्यात पावेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. तर, कोरोनाच्या काळातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणामुळे जिल्हावासियांना लाभ झाला असल्याचे ते म्हणाले. माता आणि बाल संगोपन हॉस्पीटलची वास्तू ही सुमारे १३ ते १४ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह या इमारतीवर देखील सौर उर्जा युनीट बसविण्यात येणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
असे असेल माता व बाल संगोपन हॉस्पीटल
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून उभारण्यात येणार्या माता व बाल संगोपन हॉस्पीटलची तीन मजली भव्य वास्तू असेल. याचे एकूण क्षेत्रफळ ८४७४६.९५ चौरस फूट इतके असणार आहे. यातील पहिल्या मजल्यावर एलडीआर रूम, चार आयसीयू वॉर्ड, एचडीयूएनबीसीसी डॉक्टर आणि नर्सिंग रूम, तपासणी कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह आणि सोनोग्राफी युनीट असेल. दुसर्या मजल्यावर एएनसी पीएनसी वॉर्ड, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, डॉक्टर ओपीडी रूम, आशा रूम आणि आयसीयू वॉर्ड असेल. तर तिसर्या मजल्यावर एमएनसीयू वॉर्ड, केएमसी वॉर्ड, पेडियाट्रीक वॉर्ड, स्कील लॅब, आयसीयू वॉर्ड आणि डॉक्टर व नर्सेसच्या रूम्स राहणार आहेत. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या वास्तूविशारदाकडून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी एकूण २८ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी सिव्हिल सर्जन डॉ. पंकज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद गोसावी यांनी केले. तर आभार डॉ. अमित वागदे यांनी मानले.