पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील गड किल्ले यांना गत वैभव प्राप्त व्हावे. व परिसरात नेहमी स्वच्छता राहावी या भावनेतून राजा शिवछत्रपती परिवार गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता मोहीम राबवीत आहेत. महाराष्ट्र राज्यभरातली ही 18 मोहीम त्यांनी राबवली. आणि या मोहिमेच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्ला
स्वच्छतेने शोभून दिसत आहे. परिवारातील 30 जिल्ह्यातील मावळे व त्यांच्यासोबत रणरागिणी यांनी किल्ल्याचा केलेला कायापालट महत्त्वपूर्ण आहे. परिवाराची ही स्वच्छतेची सेवा कौतुकास्पद असून राजा शिवछत्रपती परिवारासारखे योगदान अनेकांनी द्यावे असे आवाहन आमदार अमोल पाटील यांनी केले. ते भुईकोट किल्ला येथे स्वच्छता मोहीमेला सुरुवात प्रसंगी बोलत होते.
यावेळी भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण , बाजार समिती संचालक एडवोकेट रोहन मोरे,शिवसेना शहरप्रमुख अमृत चौधरी, माजी उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन सोनार, माजी नगरसेवक राजेंद्र कासार, शिवसेना उपशहर प्रमुख नितीन बारी, आरटीओ एजंट योगेश पाटील, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विलास वाघ,पी आर वाणी, राजू पाटील, विनोद पाटील, पिंटू बारी पंकज मराठे, निलेश मराठे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
प्रारंभी शहरातील शिवतीर्थ, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी भुईकोट किल्ला परिसरातील महादेव मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी राजा शिवछत्रपती परिवारातील सदस्यांनी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत किल्ल्याच्या तटबंदीसह खंदक व बालेकिल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत परिसरात जी मोठमोठी झाडे उगवून किल्ल्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी सर्व झाडे झुडपे काढलीत. यावेळी शेकडो टन कचरा गोळा करण्यात आला. पालिकेच्या माध्यमातून सदर कचऱ्याची विल्हेवाची व्यवस्था करण्यात आली.या स्वच्छता मोहीम दरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील मोहिमेत सहभाग घेतला.
राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार अमोल पाटील यांनी स्वतः श्रमदान करून मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी आमदार पाटील यांनी परिसरातील जमा झालेली झाडे झुडपे काढून भुईकोट किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सेवा दिली. त्यांच्या या सेवेचे शहरातील व्यापारी व सामाजिक संस्थांनी अभिनंदन केले. या मोहिमेसाठी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते नगरपालिका पोलीस महसूल प्रशासन तसेच छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, शहरातील शिवप्रेमी मावळे नागरिक संस्थांनी या पवित्र शिवकार्यात सहभाग नोंदविला होता.
राज्यातील 30 जिल्ह्यातील मावळ्यांची उपस्थिती पारोळा भुईकोट किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी राज्यातील सोलापूर, मुंबई, चंद्रपूर, कोल्हापूर ,नांदेड, रायगड सह इतर 30 जिल्ह्यातील किल्ला प्रेमी मावळे व रणरागिनी शहरात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच उपस्थित होत्या. त्यामुळे किल्ल्याच्या स्वच्छतेच्या निमित्ताने शहरात मावळ्यांचा कुंभमेळा भरल्याचे दिसून येत होते. यशस्वीतेसाठी राजा शिवछत्रपती परिवाराचे पारोळा तालुकाप्रमुख डॉ गोपाल पाटील व त्यांचे सहकारी तसेच छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण मोरे व त्यांचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.