जामनेर प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांची चौकशी देखील करण्यात आली असून याबाबत अद्याप सविस्तर तपशील समोर आलेला नाही.
बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करणार्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना पुण्यात बोलावून दोन दिवस कसून चौकशी केली. सोमवारी दुपारनंतर त्यांचा आणि त्यांच्या कार चालकाचा कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळे खळबळ उडाली होती. तर मंगळवारी रात्री मात्र ते जामनेर येथे येण्यासाठी निघाले आहेत. यामुळे त्यांना अटक झाली नसून त्यांची चौकशी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायनाच्या प्रक्रियेतच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर यांच्यासह आणखी सहा जणांच्या मागावर पोलीस आहेत.
दरम्यान, याच प्रकरणी चौकशी करण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना पुणे येथे बोलावण्यात आले. ते आपल्या कारचे चालक शिवाजी पाटीलला घेऊन पुण्याला रवाना झाले. सोमवारी दुपारी ते पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत होते. यानंतर मात्र त्यांचा संपर्क तुटला. तथापि, काल रात्री त्यांनी कुटुंबियांना संपर्क करून आपण जामनेर येथे येत असल्याचे सांगितले.
पारस ललवाणी यांनी बीएचआरशी संबंधीत अनेक कागदपत्रे मिळवले असून आधी तक्रारी देखील केल्या आहेत. या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.