जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भांबडी (ता. धरणगाव) येथील पीडित महिला आशाबाई दशरथ वानरखेडे यांना न्याय न मिळाल्याच्या आरोपावरून भिमराज सेना या सामाजिक संघटनेने न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शिवतीर्थ कोर्ट चौक, जळगाव येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले असून पीडित महिला आणि संघटनेचे पदाधिकारी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहेत.
न्यायासाठी अनेक वेळा पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महिला आयोग, मंत्रालय येथे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पीडित आशाबाई वानरखेडे व त्यांचे कुटुंब प्रकरणात सतत न्याय मागत असताना योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भिमराज सेनेची मदत मागितली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगाव पोलिस निरीक्षक सुनील पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही काहीच निष्पन्न न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी भिमराज सेनेने कठोर पवित्रा घेत बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा केली.

आशाबाई वानरखेडे आणि भिमराज सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ धाटे स्वतः या आंदोलनात बसले असून त्यांनी त्यांच्या मागण्याही स्पष्ट केल्या आहेत. एट्रोसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच एट्रोसिटी तक्रारीनंतर पीडितेच्या पतीवर दाखल झालेला 307 IPC चा गुन्हा खोटा असल्याने तो दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करून चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी आहे.
याशिवाय एट्रोसिटी प्रकरणातील आरोपीकडून मिळणाऱ्या वारंवार धमक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला तात्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि त्यांच्या घराला CCTV निरीक्षणाखाली आणण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच ग्रामसेवक महेश सोनवणे हे आरोपींची साथ देत असल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे प्रशासन आणि पोलीस विभागावर त्वरित पावले उचलण्याचा दबाव वाढला आहे. दरम्यान, शिवतीर्थ कोर्ट चौक परिसरात आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.



