अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील भिलाली येथील अपूर्ण बंधाऱ्याच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे भिलाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचा कोल्हापुर पध्दतीचा बंधारा या योजनेचे अपूर्ण काम पूर्ण होणे बाबत मा. कार्यकारी अभियंता लघुसिंचन जलसंधारण विभाग जळगाव यांचे कार्यालयीन कार्यारंभ आदेश असून, (जा.क्र. लेखा.२ निविदा १५२३ सन २०१४) याबाबत शासन व प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन देऊनही हे काम अपूर्ण आहे.
हा बंधारा ठेकेदार यांनी 3 जुलै 2014 रोजी अठरा महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे आदेश केलेले होते, परंतु दिनांक 14 डिसेंबर 2014 पर्यंत कामास सुरुवातच झाली नाही. त्यानंतर दिनांक 14 एप्रिल 2016 पर्यंतही काम सुरुवात न झाल्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी पाठपुरावा केला असता लघुसिंचन ज स उपविभाग पारोळा यांनी मे 2017 पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी आश्वासन दिले होते. तरीही काम पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा भिलाली व पंचक्रोशीतील नागरिकांनी 21 मे 2018 पासून बंधारा बोरी नदी पात्र उपोषण केले परंतु तरीही काम पूर्ण झालेले नाही. कार्यरंभ आदेशानुसार 18 महिन्यांच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक असतांना 56 महिने उलटूनही सदर काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सदरील काम पूर्ण होऊन काही अंशी जरी पाणी अडवले गेले असते तरी यावर्षी भिलाली व परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाई झाली नसती. सदर काम अद्यापही सुरु न झाल्याने आजपासून ग्रामस्थ बोरी नदीच्या पात्रात उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणामध्ये दीपक नामदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कन्हैयालाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ धुडकु पवार, सतीश भगवान पाटील, दत्तराव कृष्णा पाटील, गोरख भाईदास पाटील, आनंद शेनफडु पाटील, सुधाकर साहेबराव पाटील, शरद अरविंद पाटील, अनमोल भागवत साळुंखे, भूषण रवींद्र पाटील व परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.