Home राजकीय पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ब्रह्मपुत्रावरील भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ब्रह्मपुत्रावरील भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन


गुवाहाटी-वृत्तसेवा । नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाम दौऱ्यात संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थिती लावत राज्याला मोठी भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेची पाहणी केली तसेच ब्रह्मपुत्र नदीवरील भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान सकाळी प्रथम चाबुआ एअरफील्ड येथे पोहोचले. त्यानंतर ते भारतीय हवाई दलाच्या सी-१३० विमानाने दिब्रुगडला रवाना झाले. सकाळी सुमारे १० वाजता त्यांच्या विमानाने मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधा (ELF) वर यशस्वी लँडिंग केले. चीन सीमेजवळील सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेली ही सुविधा संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

भारतीय हवाई दलने विकसित केलेली ही आपत्कालीन हवाई पट्टी युद्धसदृश परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन प्रसंगी लष्करी तसेच नागरी विमानांच्या जलद हालचालीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील बचाव आणि मदत कार्याला मोठी गती मिळणार आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मोरन महामार्गावर हवाई दलाने विशेष हवाई प्रात्यक्षिक सादर केले. राफेल आणि सुखोईसह एकूण १६ लढाऊ विमानांनी महामार्गावरूनच लँडिंग आणि टेकऑफ करत आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. सुमारे ३० मिनिटे चाललेल्या या थरारक प्रात्यक्षिकाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, दुपारी १ वाजता गुवाहाटी येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे ब्रह्मपुत्र नदीच्या दोन्ही किनाऱ्यांदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होणार असून, आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

गेल्या तीन महिन्यांतील हा पंतप्रधानांचा तिसरा आसाम दौरा आहे. यावर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून, २०१६ पासून एनडीएची सत्ता राज्यात कायम आहे. त्यापूर्वी २००१ ते २०१६ या काळात काँग्रेसचे सरकार सत्तेत होते.


Protected Content

Play sound