मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षातर्फे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक बांधवांचा मेळावा कार्यक्रम आज अल फलाह हायस्कुल येथे पार पडला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, निवडणूक जवळ आली की पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे काही लोक उगवतील अपप्रचार करतील सोबत असल्याचा पुळका आणतील. परंतु आपण सजग राहायला हवे, आप-आपसात भांडणे लावणाऱ्या या व्यक्ती पासून सावध राहायला हवे, गेली 30 वर्षांपासून मी आपले नेतृत्व करत आहे. परंतु कधी जातीत भांडणे लावले नाही. मतदारसंघात शांतता भाईचारा टिकवून ठेवला “सब समाज को साथ लेके आगे है बढते जाना, सबका साथ सबका विकास” या उक्ती प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास नेला त्यात कधी जाती पातीचा भेदभाव केला नाही. अल्पसंख्याक समाज हा नेहमी माझ्या सोबत असुन, यापुढे पण राहीलच याची खात्री आहे. अल्पसंख्याक समाजाला नेहमी मी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत प्रतिनिधित्व दिले मुक्ताईनगर बोदवड येथे प्रथम नगराध्यक्ष अल्पसंख्याक समुदायी केले. अल्पसंख्याक मंत्री असताना उर्दु भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी राज्यात मालेगाव भिवंडी अशा पाच ठिकाणी उर्दू हाऊसची निर्मिती केली. मतदारसंघात अल्पसंख्याक समाज आहे. त्या प्रत्येक गावात कब्रस्तानसाठी निधी, शादीखानासाठी निधी दिला. अल्पसंख्याक समाजातील मुलांनी फक्त गवंडी काम न करता शिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ व्हावे, यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक तंत्रनिकेतनची निर्मिती केली. नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी असुन यापुढे सुद्धा राहील. असे मत व्यक्त करत म्हणाले, आपण आता पर्यंत जो मतदानरुपी आशिर्वाद दिला तो भूलथापांना बळी न पडता असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अशोक कांडेलकर यांनी भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. अल्पसंख्याक माजी अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नाथाभाऊ हे गेल्या 30 वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालत आहेत. कोणी कितीही अपप्रचार केला तरी आपल्याला नाथाभाऊ यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून नाथाभाऊ यांनी राज्यभरात अल्पसंख्याक समाजासाठी कामे केल्यामुळे अल्पसंख्याक समाजातर्फे मी नाथाभाऊ यांचे आभार मानतो.
खा.रक्षाताई खडसे म्हणाल्या आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही अपप्रचारला बळी न पडता मला मतदान केले. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. काही नतदृष्ट प्रवृत्तीचे लोक भाजपा, आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहेत. अशी गरळ ओकतात, परंतु भाजप आणि नरेंद्रजी मोदी नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी आहेत. समाजाच्या विकासासाठी केंद्र राज्यसरकारने विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितींना केले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण नाथाभाऊ यांना साथ द्याल, अशी खात्री असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे तर प्रमुख उपस्थिती खा.रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, जे.डी.सी.सी बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमाताई तडवी, बोदवड नगराध्यक्षा मुमताज बी.बागवान, प.स.सभापती शुभंगी भोलाने, उपनगराध्यक्ष मानिषा पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष शकील, सावदा येथील असगर, कालू मिस्त्री, ताहेर खान पठाण, नगरसेवक शकील बापू ससाणे, निलेश शिरसाट, मस्तान कुरेशी, आमिन खान, आरिफ आजाद, उसमा रउफ खान आदी मान्यसह अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.