भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेने घरपट्टी करात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ अव्वाच्या सव्वा असल्याने वाढीच्या नोटीसा देखील देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ही करवाढ तातडीने रद्द करावी यामागणीचे निवेदन भारत राष्ट्र समितीच्या वतीने भुसावळ नगरपालिकेला निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ नगरपालिका प्रशासन घरपट्टी करामध्ये 10 टक्के वाढ करणार आहे. असे वृत्तपत्रा द्वारे कळविण्यात आले होते. मात्र मालमत्ता धारकांना अव्वाच्या सव्वा कर वाढीच्या नोटीसा देण्यात आल्या. जसे कोणाला 42 टक्के, अनेकांना 50%, तर काहींना 100% म्हणजे थेट दुप्पट कर वाढवल्याच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. यावरुन नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या आपल्या भुसावळ नगरपालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत भोंगळ असल्याने निदर्शनास येते. भुसावळ नगरपालिका प्रशासनाकडून नियमित कर वाढ केली जाते मात्र आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यास भुसावळ न.पा. प्रशासन नेहमी उदासीन राहिलेले आहे. शहरातील बहुतांश प्रभागात 10 ते 15 दिवसांतून फक्त एकदा पाणी येते – तेही अत्यंत अस्वच्छ, गढूळ आणि दूषित असते.
शहरात अनेक ठिकाणी उकिरडे तयार होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्ते, पथदिवे, शौचालय, गटारींची देखील नीट व्यवस्था नाही. महत्वाच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे संध्याकाळ नंतर नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागतो तसेच अनेक ठिकाणी रहिवाशी भागांतील बंद पथदिवे वारंवार तक्रारी करुनही दुरुस्त करुन सुरु केले जात नाही तर काही पथदिवे दिवसा देखील सर्रास सुरु असतात. अनेक ठिकाणी कचराकुंडी मधील कचरा नियमितपणे उचलला जात नाही, नाले सफाई देखील नियमित केली जात नाही.
भर वस्तीमध्ये उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठ्या संख्येवर आहे. अशा प्रकारे सर्वच प्रमुख सुविधांचा शहरात अभाव आहे. शिक्षण कराच्या नावाखाली शिक्षण उपकर आणि विशेष शिक्षण उपकर असे 2 वेगवेगळे कर वसुल केले जात आहे, त्या मध्येही गत वर्षीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर कर वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक दृष्ट्या प्रत्यक्षात पालिकेच्या शाळा अद्ययावत तंत्रज्ञान व सुविधांपासून पूर्णत: वंचित आहे.
दर वर्षी वृक्ष कर वसुल केला जात आहे त्या संदर्भात पालिकेने शहरभर एकूण किती झाडे लावली व नेमकी किती झाडांची देखभाल केली? याचा जाहीर खुलासा करावा. सर्वच प्रकारच्या सुविधा देण्यात पालिका प्रशासन सातत्याने अपयशी ठरत अाहे. त्यामुळे, भुसावळ न.पा. प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर कर वाढीला आमचा तीव्र विरोध आहे. म्हणून आपण सदर नियमाबाह्य कर वाढ मागे घेऊन त्वरित रद्द करण्यात यावी, जर लवकरात लवकर ही अतिरिक्त कर वाढ रद्द करण्यात आली नाही तर आम्ही समस्त भुसावळकर नागरिक या नियमबाह्य वसुलीचा बहिष्कार करुन घरपट्टी किंवा पालिकेचा कोणताही कर भरणार नाही यास पूर्णपणे न.पा. प्रशासन जबाबदार राहील.