भंडारा प्रतिनिधी । येथील जिल्हा रूग्णालयाच्या नवजात शिशूकेअर युनिटला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भंडारा येथील जिल्हा रूग्णालयातला नवजात शिशूकेअर युनिटला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. यात धुरामुळे गुदमरून दहा बालके दगावली आहेत. तर उपस्थितांनी धावपळ करत सात शिशूंचे प्राण वाचवले आहेत.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.