बुलडाणा (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहणार असून, देशाची सत्ता स्थिर राहील, असे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून वर्तवण्यात आले आहे. यादरम्यान देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम राहील, परकीय घुसखोरी होत राहिली तरी भारतीय संरक्षण खाते त्याला चोख प्रत्युत्तर देत राहील, असेही भाकितात सांगण्यात आले आहे. देशाच्या संरक्षणाबाबत यावेळी प्रथमच असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी करण्यात आली होती. ३५० वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीतील धान्याच्या आधारे दरवर्षी पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय भाकित वर्तवण्यात येत असते. या भविष्यवाणीकडे बळीराजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार आज भेंडवळची ही भविष्यवाणी जाहीर झाली. यंदा राज्यात पाऊस सर्वसाधारण राहील. पहिल्या महिन्यात साधारण पाऊस असेल. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे. तिसऱ्या महिन्यात कमी-जास्त पाऊस पडेल. मात्र, पहिल्या महिन्याच्या तुलनेने नक्कीच अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चौथ्या महिन्यात लहरी स्वरुपाचा पाऊस पडेल. यावर्षी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच नैसर्गिक संकट कोसळण्याची शक्यता असून, भूकंपासारखी आपत्तीही येऊ शकते, असे या भविष्यवाणीतून सांगण्यात आले आहे.
पीकांबद्दल भाकितात म्हटले आहे की, अंबाळी मोघम असेल, रोगराई नसेल. कापसाचे उत्पादन मोघम असेल आणि भाव मध्यम राहील. ज्वारीचे पीक सर्वसाधारण असेल, भावात तेजी नसेल. गव्हाचं पीक आणि तांदळाचं उत्पादन मोघम राहील. तुरीचं उत्पादन चांगलं असेल. मुगाचं उत्पादन मोघम राहील. उडदाचं उत्पादन सर्वसाधारण राहील. तीळ उत्पादन मोघम राहील, बाजरी उत्पादन सर्वसाधारण असलं तरी भावात तेजी असेल. हरभऱ्याचं उत्पादन सर्वसाधारण असेल.
भेंडवळच्या भविष्यवाणीतून राजकीय भाकित व्यक्त करण्यात आलं. घटमांडणीत सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा कायम आहे. पान स्थिर आहे. त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी किंचित हललेली आहे. पण सत्ता स्थिर राहणार असल्याचे भविष्यवाणीतून सांगण्यात आले. करंजी हललेली असून, देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.