भडगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथे गोडेतेलाचा भाव जास्त लावल्याची विचारणा केल्याचा राग आल्याने दुकानादाराने ग्राहकाला सिमेंट बाकावर आपटल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहेे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पिचर्डे येथील पंकज विठ्ठल पाटील (वय २३) या तरुणाचे वडील विठ्ठल पाटील हे २९ रोजी सायंकाळी पिचर्डे बस स्थानक चौकातील दुकानावर गोडेतेल व किराणा घेण्यासाठी गेले होते. या वेळी दुकानदार हर्षल अशोक पाटील याने तेलाचा जास्त भाव लावला. याचा जाब पंकज पाटील याने दुकानदार हर्षल पाटील याला विचारला. याचा राग येऊन संतापाच्या भरात हर्षल पाटील याने पंकज पाटील याला शिवीगाळ करून दुकानासमोर असलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यावर आपटले. यात पंकज गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्यास तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
याबाबत मृताची आई रेखाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत दुकानदार हर्षल पाटील याच्याविरुद्ध कलम ३०२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करत आहेत. आरोपी हर्षल पाटील यास अटक करून ३० रोजी भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.