पाचोरा, प्रतिनिधी | भडगाव ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीत बढती देण्यात आली आहे. रुग्णालयाची मर्यादा ३० खाटांवरून ५० खाटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
भडगाव येथे सध्या ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे, मात्र तालुक्यातील रुग्णांची संख्या बघता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० खाटांच्या ग्रामिण रूग्नालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन आदेश काढला आहे. या निर्णयामुळे यापुढे येथे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. शिवाय खाटांची क्षमता वाढल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. शासानाच्या या निर्णयाने भडगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे.