भडगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या गिरणा परिक्रमा यात्रेतील पाचव्या टप्प्यात आज प्रारंभ झाला असून यात भडगाव ते बोरनार यांच्या दरम्यान पदयात्रा काढून ग्रामस्थांनी संवाद साधण्यात येणार आहे.
गिरणा नदीचे पुनरूज्जीवन व्हावे, यातील वाळू चोरीसह अन्य सर्व गैरप्रकारांना आळा बसावा आणि बलून बंधार्यांना परवानगी मिळावी या मागण्यांसाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गिरणा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. कानळदा येथील महर्षी कण्वाश्रमाजवळ गिरणेचे पुजन करून यास जलपुरूष राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत प्रत्येक शनिवार आणि रविवारी खासदार पाटील हे आपल्या सहकार्यांसह पदयात्रा काढून गावोगावी जनजागृती करत आहेत.
या अनुषंगाने आज सकाळी गिरणा परिक्रमा यात्रेच्या पाचव्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. पाचव्या टप्प्यातील यात्रा भडगाव पंपींग येथून सुरू झाली आहे. यानंतर वडधे, कोठली, निंभोरा आणि बोदर्डे या मार्गाने बोरनार येथे यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेच्या दरम्यान खासदार उन्मेषदादा पाटील यांचे ठिकठिकाणी ग्रामस्थांतर्फे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. या यात्रेत भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.