भडगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथील शेतकरी सहकारी संघात शासकीय ज्वारी खरेदीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेदरम्यान झालेल्या राड्यानंतर प्रशासन आता पूर्णपणे सतर्क झाले आहे. नोंदणी प्रक्रियेत उडालेला गोंधळ आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या हालानंतर तहसीलदार शितल सोलट यांनी बुधवारी स्वतः शेतकरी संघाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारचा कोणताही गोंधळ किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी संचालक मंडळाला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ६ आणि ७ एप्रिल रोजी शासकीय ज्वारी व मका खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकरी संघाच्या आवारात अचानक ८०० ते १ हजार शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. टोकन वाटप सुरू असताना व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अचानक गोंधळ उडाला आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. या दुर्दैवी घटनेत काही शेतकरी जखमी झाले होते, तर काही वृद्ध शेतकऱ्यांना उन्हाचा मोठा तडाखा बसला होता. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली होती आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार शितल सोलट यांनी शेतकरी संघाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात संभ्रम राहणार नाही. कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कुशल असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, नोंदणीबाबतचा पारदर्शक दैनिक अहवाल दररोज प्रसिद्ध करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, शेतकरी संघाने आपल्या परिसरात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीसाठी मंडप किंवा शेडची तातडीने व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या भेटीदरम्यान तहसीलदार शितल सोलट यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिगे, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर अमृतकर, पोलीस हवालदार निलेश ब्राम्हणकर तसेच शेतकरी संघाचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
“शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. नोंदणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी शेतकरी संघाने सर्व आवश्यक पावले उचलावीत, अन्यथा प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जाईल,” असा इशारा तहसीलदार शितल सोलट यांनी यावेळी बोलताना दिला.



