जळगाव प्रतिनिधी । कामावरून घरी परत जाणाऱ्या एका तरुणाला भरधाव कंटेनरने चिंचोली गावाजवळ चिरडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, घटनास्थळाहून पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाचा पाठलाग करून तरुणांनी त्याला पोलिसांच्या हवाली केला आहे.
याबाबत माहिती अशी की, गोपाळ शांताराम पाटील (वय 37 रा. धानवड ता. जळगाव) हे खाजगी वाहनावर चालक म्हणून कामाला होते. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने जळगाव येथून धानवड येथे जात होते. चिंचोली गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनर क्रमांक (एमएच 04 डीएस 0152) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गोपाल पाटील हे कंटेनरच्या मागच्या चाकात येऊन जागीच ठार झाले. दरम्यान, कंटेनरने वीस-तीस फुटापर्यंत गोपाल पाटील यांना फरफटत नेले. ही घटना घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असताना चिंचोली गावातील तरुणांसह ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान अपघात झाल्यानंतर तब्बल दीड तास मृतदेह घटनास्थळीच पडून होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. मयत गोपाल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, दोन मुली, आई-वडील, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.