Home क्राईम ‘बंगाली बाबू’चा ३१ लाखांना चुना; डोळे तपासण्याचे निमित्त करून कारागीर सोन्यासह फरार

‘बंगाली बाबू’चा ३१ लाखांना चुना; डोळे तपासण्याचे निमित्त करून कारागीर सोन्यासह फरार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून ज्याच्यावर विश्वास टाकला, त्याच कारागिराने मालकाचा विश्वासघात केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात समोर आली आहे. शहरातील जोशी पेठ भागातील ‘श्री बालाजी ज्वेलर्स’मधून सुमारे ३१ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एक बंगाली कारागीर फरार झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण सराफ बाजारात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोटन बलराम बाहेती (वय ५१) हे जळगावात गेल्या ३० वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करतात. त्यांच्याकडे असित गंगाबाला मन्ना (रा. बंशकल, पश्चिम बंगाल) हा गेल्या ३-४ वर्षांपासून कारागीर म्हणून कार्यरत होता. असितचा चुलत भाऊ तापस मन्ना याने तो इमानदार असल्याची गॅरंटी दिल्याने बाहेती यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. ३-४ वर्षे प्रामाणिकपणे काम करून असितने मालकाचे मन जिंकले होते.

डोळे तपासणीचा बनाव आणि पलायन:
२ डिसेंबर रोजी ‘मल्हार ज्वेलर्स’ कडून मिळालेल्या एका मोठ्या ऑर्डरसाठी बाहेती यांनी असितला २९७.१०० ग्रॅम वजनाचे (सुमारे २९ तोळे) २० कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास असितने ‘डोळे तपासायला डॉ. गुजराती यांच्याकडे जातो’ असे सांगून दुकानातून रजा घेतली. दुपारी १ वाजेपर्यंत तो फोनवर ‘चष्मा बनवायला दिला आहे, येतोय’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत राहिला, मात्र दुपारी ४ नंतर त्याचा फोन कायमचा बंद झाला.

सीसीटीव्हीमध्ये चोरी कैद:
बाहेती यांनी संशयावरून डॉक्टरांच्या दवाखान्यात चौकशी केली असता, तो दवाखाना त्या काळात बंद असल्याचे समोर आले. लागलीच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ४ डिसेंबरच्या रात्री १०:११ वाजता असित एका रुमालात सोने गुंडाळून दुकानातून चोरून बाहेर पडताना स्पष्टपणे दिसून आला. असितचा भाऊ तापस यानेही या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने, दोघांनी संगनमताने हा कट रचल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस तपास:
अखेर आपली ३१ लाख ६९ हजार ४१२ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाहेती यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी असित मन्ना आणि तापस मन्ना यांच्याविरुद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जळगावच्या सराफ कट्ट्यावर कारागिरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


Protected Content

Play sound