मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार, २१०० रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरु होत्या. अशातच आदिती तटकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत येईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, निवडणूक काळात सत्ताधा-यांनी लाडकी बहीणचे १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल, याबाबतच निर्णय २०२५ च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणारी आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत. ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरु केली जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना लवकरच मिळणार आहे, असे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला असला तरी, खातेवाटप होणं बाकी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंर्त्यांच्या निवडीनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता जमा होईल, असं महिला व बाल विकास विभागातील अधिका-यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते.
महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. तसे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनीही जाहीरपणे सांगून टाकले. गेल्या २८ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रूपये जमा झाले. ज्यांच्या खात्यात जुलैपासूनची रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात ७५०० हजार रक्कम जमा झाले. ज्याचा लाभ २ कोटी ३४ लाख महिलांना झाला.