जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या जळगाव जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हप्ते रखडल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज जळगाव येथील महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त महिलांनी कार्यालयात मोठा गोंधळ घातला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील हजारो महिलांनी सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि ‘केवायसी’ पूर्ण करूनही त्यांच्या बँक खात्यात अद्याप अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हाभरातून महिला पहाटेपासूनच महिला व बालकल्याण कार्यालयात जमा झाल्या होत्या. मात्र, “येथे कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत किंवा त्रुटी दुरुस्त केल्या जाणार नाहीत, तुम्ही तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे जा,” असे उत्तर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिल्याने महिलांचा संताप अनावर झाला.

लांबचा प्रवास करून आणि पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी विचारणा केली की, जर अंगणवाडी सेविकांकडून काम होत नाही म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत, तर आम्हाला परत तिथेच का पाठवले जात आहे? अनेक महिलांनी यावेळी प्रशासकीय दिरंगाईचा पाढा वाचला. “आम्ही घरकाम सोडून येथे चकरा मारत आहोत, पण अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत आहेत,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. जोपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होत नाहीत आणि थकीत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे.



