चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नल यश गोरख महाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील प्रथम (यश) गोरख महाले (वय-२२) हा नुकतीच भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर पुणेच्या खडकवासला येथील प्रशिक्षण केंद्रात तो प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणाचा कालावधी अंतिम टप्प्यात असताना बॉक्सिंग खेळताना अचानक त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर लागलीच त्यांना पुण्याच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि याच ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता. १८ ऑक्टोबर) रोजी घडली.
या घटनेने चाळीसगाव तालुक्यासह सायगाव गावात शोककळा पसरली. गावातच शासकीय इतमामात काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी करा
बालपणापासून यशला सैन्यात दाखल होऊन देश सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्याने खूप खडतर परिश्रम घेतले. खूप संघर्ष करून तो सैन्य दलात दाखल झाला. मात्र प्रशिक्षण काळात त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खंत आहे. सैन्यात शत्रूशी लढताना शहीद झाला असता तर अभिमान वाटला असता. मात्र एवढी खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत आहे. यशला तर आम्ही गमावले आहे. परंतु अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी जवानाच्या मृत्यूनंतर त्यांचे मामा डॉ. हेमंत शेवाये यांनी केली आहे.