चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सप्तश्रृंगी गडाच्या यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चौगाव येथून पायी पालखी घेऊन दर्शनासाठी निघालेल्या एका अल्पवयीन भाविकाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कळवण तालुक्यात नवी भेंडी गावाजवळ ही घटना घडली. चौगाव (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील परेश धर्मा पवार (वय 17) हा पालखी सोबत सप्तश्रृंगी गडाच्या यात्रेसाठी पायी निघाला होता. यात्रेदरम्यान नवी भेंडी गावाजवळ आयोजित भंडारा कार्यक्रमात तो जेवणासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला.

घटनेनंतर उपस्थित भाविकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शाल जीवन पवार (वय 40, व्यवसाय चालक, रा. चौगाव) यांनी कळवण पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 17/2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम 194 नुसार पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार जयंतसिंग एकनाथ सोळंके यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर. पी. गवळी करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघात, थकवा किंवा आरोग्यविषयक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सप्तश्रृंगी यात्रेदरम्यान अल्पावधीत घडलेल्या अशा घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. यात्रेच्या मार्गावर वैद्यकीय सुविधा, विश्रांती व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



