Home Cities बोदवड बोदवड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सुशोभीकरण व रुंदीकरण करा : कस्तुराबाई घुले यांची...

बोदवड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सुशोभीकरण व रुंदीकरण करा : कस्तुराबाई घुले यांची मागणी


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  बोदवड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक SH-190 (बोदवड-नाशिराबाद मार्ग) रस्त्याच्या सुशोभीकरण, दुभाजक उभारणी आणि रुंदीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. वाढती वाहतूक, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेता हा रस्ता सुरक्षित आणि सुस्थितीत करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्या कस्तुराबाई त्र्यंबक घुले यांनी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू असून बोदवड हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने येथे शाळा आणि महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात नागरिक, विद्यार्थी आणि वाहनांची मोठी वर्दळ दिसून येते.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारणे गरजेचे आहे. तसेच पुरेशा प्रमाणात स्ट्रीट लाईट बसविणे, ग्रीन बेल्ट तयार करून रस्त्याचे सुशोभीकरण करणे या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित प्रवास करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय मलकापूरकडून येणाऱ्या रस्त्याचे तसेच भुसावळकडे जाणाऱ्या शारदा कॉलनीसमोरील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या भागात वाढत्या वाहतुकीमुळे अनेकदा कोंडी निर्माण होते, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.

या निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाने या मागणीवर तात्काळ कार्यवाही करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound