किरकोळ कारणावरून तरुणासह कुटुंबियांना मारहाण: चौघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ वादातून शहरातील हरिविठ्ठल नगर येथील एका तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भोई वाड्यात घडलेल्या या घटनेत लोखंडी झाऱ्याचा प्रहार करून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिविठ्ठल नगरातील भाई गल्लीत कांतीलाल श्रीराम सपकाळे (वय ३५) हा तरुण आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. त्यांच्या घरासमोर महेंद्र पंडीत भोई राहतो. १५ जानेवारी रोजी सकाळी कांतीलाल यांच्या आई घरासमोर नाली साफ करत होत्या. त्यावेळी महेंद्र भोई यांनी विनाकारण शिवीगाळ केली. कांतीलाल यांनी आईला शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्यावर महेंद्र भोई संतापला. त्याने घरातून लोखंडी झारा आणून कांतीलाल यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात कांतीलाल गंभीर जखमी झाले.

याच वादात भरत सपकाळे यांना क्रिश भोई याने लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच विक्रम सपकाळे व त्यांच्या आईंना मनिषा भोई हिने शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली. कांतीलाल सपकाळे यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. जखमी स्थितीत ते रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी त्यांना तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी मेडीकल मेमो दिला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर कांतीलाल सपकाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे महेंद्र पंडीत भोई, पियूष महेंद्र भोई, मनिषा महेंद्र भोई, आणि क्रिश महेंद्र भोई या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content