अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील महिंदळे शिवारातील शासकीय जमिनीतील झाडे बकऱ्या खात असल्याचा विरोध केल्याच्या कारणावरून एका गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना २७ जून रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुकयातील महिंदळे शिवारातील वनविभागाच्या कपार्टमेंट नंबर ३५४ मध्ये शासकीय जमिन आहे. या जमिनीवर शासनाच्या वतीने झाडे लावण्यात आली आहे. या ठिकाणी पुंजू वेडू निकम वय ५५ रा. जानवे ता. अमळनेर हे गुरूवार २७ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी शासकीय जमिनीवर लावलेली झाडे बकऱ्या खात होते. यावेळी कर्मचारी म्हणून पुंजू निकम यांनी विरोध केला. या कारणावरून अमोल सुनिल भिल आणि बापू सुनिल भिल दोन्ही रा. जानवे ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार घडल्यानंतर पूंजू निकम यानी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अमोल सुनिल भिल आणि बापू सुनिल भिल दोन्ही रा. जानवे ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.