किरकोळ कारणावरून महिलेसह तिच्या मुलांना मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात एका किरकोळ कारणावरून महिलेच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. मुलांना घरी बोलावल्याचा राग आल्याने तिघांनी महिलेसह तिच्या मुलांवर दगडफेक करत लाकडी बांबूने मारहाण केली. या घटनेत महिला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाले असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर हुडको परिसरातील नवीन घरकुल भागात संगिता दिलीप महाले (वय ४०) या महिला आपल्या कुटुंबासोबत राहतात. दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचे मुलगे राज आणि सुमित घरासमोर गल्लीतील इतर मुलांसोबत उभे होते. त्याच वेळी, त्यांचा नातू घरी आल्यामुळे संगिता महाले यांनी आपल्या मुलांना घरात बोलावले. मात्र, यावरून परिसरातील राजू राजपूत, बापू राजपूत आणि निलेश राजपूत यांना राग आला.

राजू, बापू आणि निलेश राजपूत यांनी संतापून राज व सुमित यांना लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. आईने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, बापू राजपूत याने संगिता महाले यांच्यावर दगड भिरकावला. हा दगड त्यांच्या डोळ्याच्या बाजूला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी, मनिष महाले घराबाहेर येत असताना तिघांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. यात ते देखील गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी महाले कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली. संगिता महाले आणि तिच्या मुलांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेमो दिला. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजू राजपूत, बापू राजपूत आणि निलेश राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content