अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कोंबडी बाजार परिसरात नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अमळनेर नगरपालिकेच्या वतीने येथील अतिक्रमण काढत असताना एका टपरीवाल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील कोंबडी बाजार परिसरामध्ये नवीन रस्त्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे बांधकामास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अमळनेर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली आहे. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी राधेश्याम रामेशचंद्र अग्रवाल रा. पानखिडकी ता.अमळनेर यांच्यासह त्यांचे सहकारी हे अतिक्रमण काढत असताना रस्त्यावर असलेले टपरी काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान टपरीचे मालक जितेंद्र रंजन साळुंखे आणि दशरथ रंजन साळुंखे दोन्ही रा. अमळनेर यांनी नगरपालिका कर्मचारी राधेश्याम अग्रवाल याला शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी नगरपालिका कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे जितेंद्र रंजन साळुंखे आणि दशरथ रंजन साळुंखे दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. कॉ. नाना पवार करीत आहे.

Protected Content