फैजपूर, प्रतिनिधी | प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या सर्वांगीण विकासासोबतच आपण ज्या ठिकाणी काम करीत आहोत, तेथील परिसर, संस्था, समाज आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीसाठी मदत करावी. आपल्या आजूबाजूचे वातावरण चांगले ठेवणे, ही आपलीच सर्वांगीण जबाबदारी आहे. दक्षता जनजागृती आठवड्याच्या निमित्ताने व्यक्तिगत आणि संस्था पातळीवर आपण दक्ष रहावे, असे आवाहन डॉ. राजहंस यांनी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत केले.
संपूर्ण भारतभर दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह चे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी मा कर्नल सत्यशील बाबर आणि धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी एक दिवशीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. यासाठी पीस फाऊंडेशनचे संचालक डॉ राजहंस यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ४५ एनसीसी कॅडेटस ५८ इतर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेचा विषय ‘संस्था पातळीवर भ्रष्टाचार मुक्त वातावरण निर्मितीसाठी घ्यावयाची काळजी’ असा ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक लेफ्ट. राजेंद्र राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ अध्यक्ष आ. शिरिष चौधरी, तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाऱ्हे, महेश पाटील, सुधीर पाटील, तोसीफ तडवी, दुर्गेश महाजन यांनी परिश्रम घेतले.