सावधान…तुमची तर अशी फसवणूक होत नाही ना ? मग हे वाचाच !

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे सांगून एका शेतकऱ्यांकडून वेळोवेळी सुमारे साडेपाच लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यात फसवणूक करणाऱ्यांमध्ये पाच जणांची नावे समोर आली आहे.

जळगाव लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात राहणारे एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला त्यांच्या रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सन २०१८ पासून वेळोवेळी सुमारे साडेपाच लाखांची रोख व ऑनलाईन पध्दतीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर सोपान जावळे वय ५५ रा. ममुराबाद ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा कुणाल प्रभाकर जावळे याला रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून सतीश दिलीप चौधरी वय-३२, शशिकांत दिलीप चौधरी वय २९, धर्मराज भैय्या रमेश खैरनार वय ३५, सरिता पंढरीनाथ कोळी वय ४५ सर्व रा, चहार्डी ता.चोपडा, पंढरीनाथ भागवत कोळी वय ५० रा. चहार्डी ता.चोपडा यांनी वेळोवेळी शेतकरी प्रभाकर जावळे यांच्याकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाईन पध्दतीने एकुण साडे पाच लाख रूपये घेतले. त्यानंतर मुलाला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे मागितले असता पैसे देण्यास देखील नकार दिला. त्यामुळे पिडीत शेतकरी प्रभाकर जावळे यांनी जळगाव न्यायालयात तक्रार दाखल केली. दरम्यान जळगाव न्यायालयाने तक्रारीची दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभाकर सोपान जावळे यांच्या फिर्यादीवरून सतीश दिलीप चौधरी वय-३२, शशिकांत दिलीप चौधरी वय २९, धर्मराज भैय्या रमेश खैरनार वय ३५, सरिता पंढरीनाथ कोळी वय ४५ सर्व रा, चहार्डी ता.चोपडा, पंढरीनाथ भागवत कोळी वय ५० रा. चहार्डी ता.चोपडा यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.

“ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा” – पोलिसांचा इशारा
नोकरीच्या आमिषाने अनेक लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे मोठी रक्कम कोणालाही देऊ नये. कोणत्याही नोकरीसाठी योग्यरीत्या चौकशी करूनच निर्णय घ्यावा, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. जर तुम्हालाही अशी ऑफर मिळाली, तर सावध व्हा! आपल्या मेहनतीच्या पैशांची फसवणूक होऊ देऊ नका!

Protected Content