जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स चोरीला गेल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. तिकिट काढतांना हा प्रकार लक्षात आला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
सुत्रांच्या माहितीनुसार, रूपाली किशोर अवकाळे (वय-29) रा. जामनेर ह्या बँकेच्या कामानिमित्त सोमवारी सकाळी जळगावात आल्या होत्या. जळगावातील काम आटोपून जामनेर येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. जळगाव- जामनेर बस क्रमांक (एमएच 20 बीएल 3362) बस आली. सोबत असलेल्या तरूणींसह त्या बसमध्ये बसल्या. त्यानंतर बस जामनेरला जाण्यासाठी निघाली. महिला वाहक तिकीट काढण्यासाठी आल्यानंतर तिकीट काढण्यासाठी रूपाली यांनी पर्स बघितली असता ती मिळून आली नाही. त्यावेळी त्यांना आपली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. बस आकाशवाणी चौकात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. चोरटा बसमध्येच असावा अशी शंका निर्माण झाल्यावर त्यांनी बस जिल्हा पेठ पोलीसात नेली. यामुळे तासभर इतरही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. चोरीला गेलेल्या पर्समध्ये अडीच हजार रूपये रोख, मोबाईल, बँकेचे एटीएमकार्ड आणि पॅनकाडे होते. बसमधील सर्व प्रवाश्यांची चौकशी केल्यानंतर बस जामनेरला रवाना झाली. याबाबत महिलेने पोलीसात तक्रार नोंदविली आहे.