मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर हा फुटला असून या प्रकरणी पोलिसांनी एका खासगी क्लास चालकाला अटक केली आहे.
बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या मुकेश यादव या शिक्षकाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स ऍपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत.