बारामती विधानसभेतही होणार लोकसभेसारखीच हायव्होल्टेज फाईट; काका-पुतण्याचा रंगणार सामना

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत काका विरूद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे.

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

आता बारामतीत हायव्होल्टेज लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत अशीच हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. त्यावेळी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा सामना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

Protected Content