पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निपाणे येथे एका महिलेच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील निपाणे गावातील एका वृध्द महिलेचा ११ सप्टेंबर रोजी रात्री वृध्दापकाळाने मृत्यू झाली. तिच्या पार्थिवावर दुसर्या दिवशी रात्री गावातील जिल्हा परिषदेने बांधलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. यानुसार दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास या महिलेची अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमीत पोहचले. येथे गावातील दुसर्या समाजाच्या लोकांना सदर स्मशानभूमी ही आमच्या समाजाची असून तुम्ही बाहेर अंत्यसंस्कार करा असे धमकावले. याप्रसंगी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून देखील त्यांना धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आले. यामुळे या महिलेचे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागले.
गावातील जिल्हा परिषदेने बांधलेले स्मशानभूमी ही कोणत्याही एका समाजासाठी नसून ती सर्व समाजांसाठी असते. यामुळे कुणालाही यात अंत्यसंस्कार करण्यापासून वंचित ठेवता येत नाही. यातील मयत महिला ही मागासवर्गीय समाजातील असल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला येथे मज्जाव करण्यात आल्याचा आरोप या महिलेच्या आप्तांनी केला असून या प्रकरणी त्यांनी आज पाचोरा पोलीस स्थानका फिर्याद दिली.
या फिर्यादीनुसार, ११ जणांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४७, २९७, ३२३, ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलम ३ (१) (आर); कलम ३ (१) (एस); ३(१) (५) ; ३ (१) (झेड); ३ (२) (व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असून याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.