सावदा प्रतिनिधी । सावदा ते पाल गावादरम्यान असलेल्या बोरघाटात पाच अज्ञात चोरट्यांनी चारचाकी कारला अडवून बापलेकाला धमकावत रोकडसह मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, लिलाधर टिकाराम भंगाळे (वय-५३) रा. पाल ता. रावेर हे बेकरीचा व्यवसाय करतात. कामाच्या निमित्ताने ते १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आपल्या मुलासह कारने सावदा आणि पालच्या दरम्यान असलेल्या बोरघाटातून जात असतांना रस्त्यावर झाडाची फांदी टाकलेली दिसून आली. लिलाधर भंगाळे हे खाली उतरल्यानंतर अनोळखी पाच चोरटे हाता कुऱ्हाड, विळा आणि काठ्या घेवून आले. त्यांनी दामदाटी करून लिलाधर भंगाळे यांच्याकडील १५ हजार रूपये रोख आणि मुलाच्या हातातील ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतला. आणि त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक करून फरार झाले. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा लिलाधर भंगाळे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे.