नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात आज एका पत्रकार परिषदेत घोषणा केली. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे फॅड वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. परिणामी, ई-सिगारेटचे उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी घालण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कॅनडा आणि इंग्लंड या देशांमध्ये ई-सिगारेटवर यापूर्वीच बंदी आहे. दरम्यान,पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्यात आरोपीला पकडलं तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
ई-सिगारेट म्हणजे काय
सिगारेटचे व्यसन जडलेल्यांना पर्याय म्हणून ई-सिगारेटचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. तर बॅटरीचा वापर केला जातो. याच्या टोकाला LED लाईट असतो आणि सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होतं. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग देखील पडत नाहीत.