जळगाव प्रतिनिधी । देशभरातील समाजबांधवांच्या हितासाठी झटणार्या बंजारा टायगर्स संघटनेची राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते.
लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध सामाजिक संघटनांची माहिती जगासमोर देण्यात येत आहे. या अनुषंगाने आज बंजारा टायगर्स संघटनेच्या वाटचालीबाबत माहिती देत आहोत. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम जाधव आणि चिटणीस वाल्मीक पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संस्थेची माहिती दिली. आत्माराम जाधव यांनी बंजारा टायगर्स या संघटनेची स्थापना केली असून आज देशातील तब्बल बारा राज्यांमध्ये याचा प्रसार झाला आहे. याबाबत माहिती देतांना आत्माराम जाधव म्हणाले की, बंजारा समाज हा देशातील एक प्रमुख समाज घटक असला तरी आमच्या वाट्याला तुलनेत कमी सुविधा आल्या आहेत. आमचा समाज हा प्रामुख्याने तांड्यांवर आणि दुर्गम भागांमध्ये राहत असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी सुविधा या आम्हाला कमी प्रमाणात मिळत आहेत. यामुळे आम्हाला आमचे हक्क मिळावेत यासाठी बंजारा टायगर्स संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.
आत्माराम जाधव पुढे म्हणाले की, बंजारा टायगर्स संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाज हितासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यात प्रामुख्याने समाजाचे श्रध्दास्थान असणारे दिवंगत वसंतरावजी नाईक यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यास आम्ही प्रारंभ केला आहे. याशिवाय संत सेवालाल महाराज यांची जयंतीदेखील साजरी केली जाते. तसेच बंजारा समाजातील अत्यंत महत्वाचा असणारा होळी उत्सव, तीज महोत्सव आदींनाही सामूहिक पध्दतीत साजरे केले जाते. तसेच समाजाचे मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, सत्कार समारंभ, रोजगार मेळावे आदींचेही वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे. तर समाज हितासाठी अनेक आंदोलनेही केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, आत्माराम जाधव पुढे म्हणाले की, बंजारा समाजाची देशातील संख्या ही सुमारे १२ करोड असली तरी तुलनेत समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व योग्य प्रमाणात मिळलेले नाही. यामुळे समाजाच्या मागण्या शासकीय दरबारी मांडून त्यांचे निराकरण करावे यासाठी आपण संघटनेची लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सुध्दा जाधव यांनी दिली.
पहा : आत्माराम जाधव नेमके काय म्हणालेत ते !