Home Cities जळगाव बंजारा समाज रस्त्यावर; एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मागणी मोर्चा

बंजारा समाज रस्त्यावर; एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मागणी मोर्चा

0
233

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांप्रमाणे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी आज बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. जळगाव शहरातल्या शिवतीर्थ मैदान येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याने परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच मोर्चातील कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण घोषणाबाजी सुरू केली. “बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे” आणि “हैदराबाद गॅझेट लागू करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समाजातील तरुणांनी, महिलांनी आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मागण्यांचे निवेदन सादर
मोर्चाच्या शेवटी बंजारा समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये होत असताना, महाराष्ट्रात मात्र त्यांना हे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे समाजाला अनेक शासकीय योजना आणि शैक्षणिक संधींपासून वंचित राहावे लागत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. शासनाने या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Protected Content

Play sound