मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतातील विविधता, इक्विटी आणि समावेशन सोल्यूशन्स कंपनी ‘अवतार ग्रुप’चा महिलांशी निगडीत एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये पुण्याबाबत एक दिलासादायक बाब आहे. कंपनीने अलीकडेच ‘टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया निर्देशांकाची तिसरी आवृत्ती जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर पुण्याने, भारतातील नोकरदार महिलांसाठी सर्वात समावेशक, सुरक्षित असलेल्या पहिल्या पाच भारतीय शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
पुण्याने कार्यक्षम प्रशासन आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी उच्च दर्जाचे जीवनमान याबाबत उच्च गुण मिळवले आहेत. या यादीत बेंगळुरूने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. टॉप 10 शहरांमध्ये बेंगळुरूनंतर चेन्नई, मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि कोईम्बतूर यांचा समावेश आहे. या अहवालासाठी, फोकस ग्रुप चर्चा आणि फेब्रुवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 60 शहरांमधील 1,672 महिलांच्या सहभागासह देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.